रामटेक येथील योगीराज रुग्णालयाच्या कामगिरीचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सन्मान

IMGL1362

रामटेक येथील योगीराज रुग्णालयाच्या कामगिरीचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सन्मान
रामटेक येथील योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयाला नुकतेच मा. श्री. फग्गन सिंग कुलस्ते, केंद्रीय राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे हस्ते विदर्भांतील आदिवासीबहुल ग्रामीण भागात उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल मानचिन्ह देऊन गौवरविण्यात आले. विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनच्या व्यासपीठावरून देण्यात आलेला हा पुरस्कार योगीराज रुग्णालयाचे प्रमुख केंद्रीय अधिकारी डॉ. दीपक डोंगरे यांनी नुकत्याच झालेल्या एका आरोग्य परिषदेत स्वीकारला. याप्रसंगी विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. उदय माहूरकर, कोषाध्यक्ष प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. समीर पाल्तेवार, सचिव व आरोग्यसेवा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. अनुप मरार, बालरोगतज्ज्ञ व कॉमहॅडचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, नामवंत नेत्ररोगतज्ज्ञ, राज्यसभा खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ. अशोक अरबट, डॉ. श्रीवास्तव मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना योगीराज रुग्णालयाचे मुख्य केंद्रीय अधिकारी डॉ. दीपक डोंगरे म्हणाले की रुग्णालयाशी जुळलेल्या प्रत्येक डॉक्टर व लहानमोठ्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या पाच वर्षातील केलेल्या सांघीक कामगिरीचा हा मान आहे. या गौरवामुळे रामटेक नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. रुग्णालयाला सातत्याने मदत करणाऱ्या सरकारी व गैरसरकारी संस्था यांच्या पाठिंब्यामुळेच रुग्णालयाला ही मजल मारता आली. आरोग्यक्षेत्रात अजून नवे-नवे उपक्रम राबविण्यासाठी आणि आणखी दुर्गम भागात आमच्या सेवा पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त संस्था रुग्णालयाशी जुळाव्या असे त्यांनी आवाहन केले. भविष्यातही ग्रामीण आरोग्यक्षेत्रात सुरु असलेली उत्कृष्ट कामगिरी कायम राहील तसेच अजून तज्ज्ञांच्या सेवा सुरु करण्यात येतील अशी त्यांनी ग्वाही दिली. याबद्दल ऑरेंज सिटी रुग्णालयाचे अध्यक्ष श्री. उदयभास्कर नायर, संचालक डॉ. उषा नायर, डॉ. विद्या नायर, श्री. लक्ष्मीनारायण देवस्थानाचे अध्यक्ष श्री. नारायणदास अग्रवाल, एड. संजीव खंडेलवाल यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.